महाविद्यालयाची स्थापना

दिनांक १ मे १९९३ पासून महाड तालुक्यातील शैक्षणिक कार्य करीत असतानाच शिवाई शिक्षण प्रसारक मंडळाने परिसरातील शैक्षणिक गरजांचा अभ्यास केला. या अभ्यासाच्या पार्श्वभूमीवर दि. २१ जानेवारी १९९६ रोजी नाशिक येथिल गोखले एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने संस्थेने महाड येथे Towards Making Higher Education Effective  या विषयावर एका राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन केले होते या परिसंवादामध्ये माजी केंद्रीय मंत्री श्री. मोहन धारीया यांच्यासह अनेक नामवंत शिक्षणतज्ञ सहभागी झाले होते.

शैक्षणिक गरजांचा अभ्यास व परिसंवादातील चर्चा यामधून संस्थेला एक गोष्ट अत्यंत प्रकर्षाने जाणवली की पोलादपूर या रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेकडील तालुक्यात स्वातंत्रप्रप्तीच्या ५० वर्षानंतर देखील उच्च शिक्षणाची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने तालुक्यातील युवक व युवतींना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते. विशेषतः मुलींच्या दृष्टीने उच्च शिक्षण ही एक स्वप्नातील गोष्ट होती. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच विद्यार्थी बाहेरगावी जावून उच्च शिक्षण घेत होते.

वरील उणीव दूर करण्यासाठी शिवाई शिक्षण प्रसारक मंडळाने पुढाकार घेतला व दिनांक २१ सप्टेंबर १९९८ रोजी माजी ग्रामविकास मंत्री श्री प्रभाकरजी मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलादपूर येथे सुंदरराव मोरे महाविद्यालयाची स्थापना केली.